विभागाविषयी

पोलीस बिनतारी संदेश विभागाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये सन १९४६ साली तत्कालीन मुंबई राज्यात करण्यात आली. तत्पूर्वी राज्य पोलीस दलाकरीता स्वयंपूर्ण अशी स्वतःची दळणवळण व्यवस्था नव्हती आणि सर्वार्थाने पोलीस दलाला दळणवळण संपर्काकरिता केंद्रीय दूरसंचार विभागाच्या यंत्रणेवर अवलंबून रहावे लागत असे.

साधनसामुग्रीच्या कमतरतेमुळे दुसर्‍या महायुद्धामध्ये वापरात आलेले जुने बिनतारी संच उपयोगामध्ये आणून महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाच्या बिनतारी दळवळणाची सुरुवात करण्यात आली. सन १९४६ मध्ये या योजनेद्वार उच्च कंपन (एच. एफ.) पद्धतीचे बिनतारी दळणवळण उभारून एकूण १३ जिल्हायाकीरता पुरविण्यात आले होते व सदर जिल्हयांचा दळणवळण संपर्क तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य याचे पुणे स्थित मुख्यालयाशी प्रस्तापित करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी हे बिनतारी संदेश उपविभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. सन १९४७ मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तत्कालीन मुंबई राज्याचे पहिले विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून श्री एन.एम.कामटे यांची नियुक्ती करण्यात आली. तदनंतर श्री एस.एम.नाबर यांची तांत्रिक पात्रतेनुसार पोलीस अधिक्षक बिनतारी संदेश या पदावर नियुक्ती करण्यात आली. बिनतारी संदेश विभाग हा प्रशासकीय दृष्टने विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापासून अलग होऊन स्वतंत्रपणे कार्यरत झाला.

सुरवातीच्या कालावधीमध्ये बिनतारी संदेश यंत्रणेची उभारणी ही संचालक, आम्डॅ फोर्सेस यांनी निष्कासित केलेले बिनतारी संच वापरून करण्यात येत होती. सदर यंत्रणेचे परिचलन पोलीस दलातील सुशिक्षीत शिपायांमार्फत, पुणे स्थित आर्मी व एअरफोर्सचे बिनतारी दळणवळण प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण देऊन करण्यात येत असे. पोलीस दलाचे दैनंदिन कार्यपद्धतीमध्ये बिनतारी संदेश दळणवळणाची उपयुक्तता दृष्य स्वरूपामध्ये दिसून आल्याने, जिल्हानिहाय तालुकास्तरावर तसेच अन्य मोक्याच्या ठिकाणी बिनतारी स्थानकांची उभारणी करण्यात आली.
काही शहरी जिल्हा मुख्यालय ठिकाणांकरीता चलत स्थानकांचीही उभारणी करण्यात आली करिता प्राप्त बिनतारी सामुग्रीमध्ये आवश्यक दृष्टीकोनातून सुयोग्य बदल करून पुनर्वापर करण्यात आला.

एच.एफ. टेलीग्राफी पद्धतीचे दळणवळण जिल्हास्तरावर कार्यान्वित झालेनंतर मुंबई शहराअंतर्गत अती उच्च कंपन (व्ही.एच.एफ.) पद्धतीचे दळणवळणास सुरुवात करण्यात आली. जुन्या बिनतारी संचांमध्ये वापरायोग्य फेर बदल करून ते उपयोगात आणण्यात आले. तात्पुरत्या स्वरुपात, मुंबई शहर पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस नियंत्रण कक्ष (पोलीस कंट्रोल रूम) स्थापित करण्यात आला व सदर नियंत्रणकक्षाचा संपर्क शहरांतर्गत अहोरात्र कार्यरत ४० गस्त पथकांशी प्रस्थापित करण्यात आला.

सन १९८४ मध्ये व्ही.एच.एफ.पद्धतीच्या दळणवळणाची सुविधा जिल्हा अंतर्गत स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देऊन, जिल्ह्यातील पोलीस स्थानकांचा दळणवळण संपर्क जिल्हा पोलीस मुख्यालयाशी प्रस्थापित करण्यात आला. त्याचबरोबर केंद्रित दूरसंचार विभागाकडून टेलिप्रिंटर लाईन्स भाडेतत्वावर घेऊन परिक्षेत्रीय पोलीस मुख्यालये आणि राज्य पोलीस मुख्यालयदरम्यान टेलिप्रिंटर दळणवळण सुरु करण्यात आले.

लिखित संदेश देवाणघेवाण करिता, उपलब्ध विश्वसनीय अशा मोर्स पद्धतीचे दळणवळण करणे कंटाळवाणे तसेच वेगमर्यादा कमी असलेले दळणवळण प्रचलित होते. सन १९८८ मध्ये अ॓.सी.एस.(Auto communication System) ही मायक्रोप्रोसेसर युक्त प्रणाली वापरून लिखित संदेशांची देवाणघेवाण जिल्हा पोलीस मुख्यालये व राज्य पोलीस मुख्यालय, मुंबई यांचे दरम्यान दळणवळण यंत्रणा उभारण्यात आली. त्याद्वरे माहितीची देवाणघेवाण अतिशय जलद गतीने होऊ लागली.

बिनतारी दळणवळणाची व्याप्ती व कार्यक्षेत्र यामध्ये वाढ करण्याचे दृष्टीकोनातून जिल्हा अंतर्गत उच्च ठिकणी बिनतारी संदेश पुनःप्रक्षेपण केंद्रची उभारणी करून आंतर जिल्हा दळणवळण संपर्क प्रस्थापित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयांचा संपर्क राज्य पोलीस मुख्यालय मुंबई येथे प्रस्थापित करणेकामी टार्स लिंकची (Trunk Auto Repeater Station Link )उभारणी करण्यात आली.

राज्यांतर्गत जिल्हा स्तरावर, परिक्षेत्रीय पोलीस मुख्यालय ठिकाणी व राज्य पोलीस मुख्यालय येथे मॅन्युअल ऑपरेशनद्वार कार्यान्वित असणार्‍या एक्सचेजमुळे कार्यपद्धतीवर मर्यादा येत असल्याने आधुनिक सी-डॉट पद्धतीच्या स्वयंचलित टेलीफोन एक्सचेजेसची उभारणी सन १९९० मध्ये करण्यात आली त्यामुळे एक्सचेजद्वारे दळणवळणाचे कार्यक्षमतेमध्ये अमुलाग्र बदल झाला.

सन १९९५ मध्ये पुणे शहर, नागपूर शहर व मुंबई शहर कार्यक्षेत्रातर्गत यु.एच.एफ.प्रणालीचे दळणवळण सुरु करण्यात आले त्यामुळे बिनतारी दळणवळणाच्या दृष्टीने शहरांतर्गत उंच इमारती सारख्या विविध अड्थळयावर मात करून संभाषणाचा दर्जा व स्पष्टता यामध्ये सुधारणा झाली.

मुंबई शहर पोलीस आयुक्तलय कार्यक्षेत्रात सन १९९७ मध्ये अत्याधुनिक अशा रेडिओ ट्रंकिंग प्रणाली असलेली  दळणवळण सुविधा पुरविण्यात आली. या योजनमध्ये अनेक रेडिओ चॅनल्स हे नेटवर्क मधील असंख्य बिनतारी संचांना कार्यक्षमतेने उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे विभागासाठी एकत्रित बिनतारी नेटवर्क प्रणाली उपलब्ध होऊ शकते. उपलब्ध चॅनल मागणीप्रमाणे अनुक्रमे वितरीत करण्यात येतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीमधील रिकामा चॅनल उपलब्ध असतानाही बिनतारी दळणवळण करता न येणे ही त्रुटी राहत नाही. यामुळे संभाषनासाठी विलंब न होता खात्रीशीरपण॓ चॅनल उपलब्ध होतो. संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलीस विभागाने सर्वप्रथम सदर यंत्रणा उपयोगात आणली आहे.

सन १९९८ मध्ये SCPC DAMA तंत्रज्ञानयुक्त प्रणालीचा वापर करून INSAT3B या उपग्रहाद्वारे दळणवळण सुविधा (V-SAT : Very Small Aperture Terminal)पोलीस दलाकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याद्वारे संभाषण व लिखित संदेशाची देवाणघेवाण होऊ लागली. पुणे स्थित भूकेंद्र येथील एन.एम.एस.(Network Management System) हा या यंत्रणेचा अविभाज्य घटक असून राज्यांतर्गत एकूण ५२ स्थानके कार्यरत होती.

Polnet 2.0 हे देशाच्या पोलीस दूरसंचाराच्या आधुनिकीकरणासाठी एक राष्ट्रव्यापी उपग्रह आधारित संदेशवहन नेटवर्क आहे. Polnet 2.0 ही एक प्रगत आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) बेस कम्युनिकेशन प्रणाली आहे जी 2019 पासून गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली द्वारे लागू आणि शासित आहे. नेटवर्कचा मूळ उद्देश देशव्यापी व्हॉइस, फॅक्स आणि डेटा कम्युनिकेशन प्रदान करणे आणि राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो संगणकांना कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात ६४ Polnet 2.0 स्थानके आहेत.

राज्यांतर्गत सर्व जिल्ह्याकरिता बिनतारी संदेश दळणवळणासाठी VHF Radio Network ची उभारणी करण्यात आली आहे. सदर व्ही.एच.एफ. रेडीयो नेटवर्कद्वारे पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस स्थानके व पोलीस वाहने यामध्ये बिनतारी दळणवळण संपर्क होतो. प्रामुख्याने व्हॅईस काल तसेच बिनतारी संदेशांची देवाणघेवाण या रेडिओ नेटवर्कचा वापर करून करण्यात येते. संदेश वहनाच्या प्रचलित पद्धतीमध्ये बिनतारी संदेश पाठवीणारा, संदेश वाचनाद्वारे प्रक्षेपित करतो व संदेश ग्रहण करणारे स्थानकातील कर्मचारी सदर संदेश लिहुन घेतात. संदेश पाठविण्याच्या सध्याच्या या पद्दतीमध्ये वेळ जास्त लागतो व पर्यायाने बिनतारी संदेश वाहिनी जास्त कालावधीकरिता व्यस्त राहते प्रचलित पध्दतीमध्ये संदेश देवाणघेवाण होताना त्यामध्ये चुका होण्याची शक्यता अधिक असते तसेच वारंवार पुर्नप्रक्षेपण करावे लागते. याप्रमाणे बिनतारी संदेश दळणवळणामध्ये व्हाईस कॉल करिता बिनतारी वाहिनीचा उपलब्ध वेळ कमी झाल्याने, नियंत्रण कक्षाचे दैनंदिन कायदा व सुव्यवस्था संदर्भातील माहितीचे देवाणघेवाण करिता वाहिनीवर अत्यल्प वेळ मिळतो व महत्त्वाचे व्हाईस कॉल प्रलंबित राहतात.

VHF Radio Network च्या उपरोक्त नमूद मर्यादा दूर करण्यासाठी Existing VHF Radio Network चा वापर करून त्यावर Data Communication प्रणाली बिनतारी संदेश विभागातील संशोधन व विकास विभागाने विकसित केली असून त्याद्वारे Existing VHF Radio Network मधील पोलिस स्थानकातील VHF बिनतारी संचास संगणक जोडणी करून त्याद्वारे Network मध्ये Data capability ही सुविधा उपलब्ध झाली.

बिनतारी संदेश संगणकाद्वारे प्रक्षेपण /ग्रहण करणे शक्य झाले असून त्याचे मुख्य फायदे खालील प्रमाणे आहेत.
१. गतिमान पध्दतीने दळणवळण.
२. मराठी अथवा इंग्रजी भाषेमधील संदेश Low Resolution, Web Camera Photo याची देवाणघेवाण.
३. एका वेळी एकापेक्षा जास्त स्थानकांना संदेशांची देवाणघेवाण.
४. गोपनीयतेच्या दृष्टीकोनातून काही प्रमाणात संदेशास सुरक्षितता.
५. चॅटींगद्वारे संदेशांची तात्काळ पोच सुविधा.

आधुनिकीकरण सन २००८-०९ अंतर्गत राज्यातील १३ जिल्हयाकरिता उभारण्यात आलेली यंत्रणा इतर ४०१ ठिकाणी यशस्वीरीत्या उभारणी करण्यात आली.

पोलीस दला अंतर्गत स्वयंपूर्ण दळणवळण व्यवस्थेकरिता शहर पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी टेलिफोन लाईन्सचा वापर करून स्वतंत्र टेलिफोन एक्सचेंजेसची उभारणी करण्यात आली. पोलीस नियंत्रण कक्ष स्थानिक सामान्य नागरीकांचे सोईकरिता आपत्कालिन सेवा सुविधा टेलिफोन क्रमांक १००(DIAL100)ची उभारणी येथे करण्यात आली. त्याद्वारे नागरिकांचे मदतीसाठी संबंधीत घटनास्थळ जवळच्या गस्तीपथक वाहनास पाठविण्यात येते. DIAL112 इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम (ERSS) ही प्रणाली नागरिकांसाठी संपूर्ण भारतात एकमेव नंबर (112) आधारित आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली म्हणून कार्यरत आहे. प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशात आपत्कालीन मदत हाताळण्यासाठी समर्पित आपत्कालीन प्रतिसाद केंद्रे (ERC) उभारलेली आहेत. यामध्ये पोलीस, अग्निशामक, बचाव, आरोग्य आणि इतर सेवांकडून आपत्कालीन मदत हवी असल्यास, फोनवरून 112 डायल करता येते. महाराष्ट्रात DIAL112 सेवा सन 2021 पासून कार्यरत आहे.

एकमेकांशी संपर्क हा कोणत्याही प्रकारच्या तारांचे जाळे न वापरता करणे याला ‘वायरलेस कम्युनिकेशन’ असे म्हणतात. देशाच्या संरक्षण क्षेत्रात, पोलीस दलात संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी वायरलेस कम्युनिकेशनचा वापर केला जातो. ज्यामुळे गोपनीय माहिती ही इतर कोणालाही ऐकता येत नाही ती एंड टू एंड इनक्रिप्ट करून सुरक्षित देवाणघेवाण होते.

पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागातील मनुष्यबळ तक्ता

अनु क्र.हुद्दामंजूर पदे
1अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन, म. राज्य, पुणे1
2पोलीस उप-महानिरीक्षक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, म. राज्य, पुणे1
3अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, म. राज्य, मुंबई1
4पोलीस उप- अधीक्षक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान5
5पोलीस उपायुक्त, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान2
6पोलीस उप-अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त37
7पोलीस निरीक्षक179
8पोलीस उप-निरीक्षक426
9सहायक पोलीस सब-इन्स्पेक्टर ( वरिष्ठ तांत्रिक अधिकारी))874
10पोलीस हवालदार (तांत्रिक अधिकारी)1958
11सहायक पोलीस सब-इन्स्पेक्टर (वरिष्ठ तांत्रिक सहायक)8
12पोलीस हवालदार (तांत्रिक सहायक)24
13पोलीस नाईक (तांत्रिक सहायक)73
14पोलीस शिपाई (तांत्रिक सहायक)247
15सहायक पोलीस सब-इन्स्पेक्टर (वाहक)1
16पोलीस हवालदार (वाहक)4
17पोलीस नाईक (वाहक)10
18पोलीस शिपाई (वाहक)18
एकूण3869
Scroll to Top